आज विजयादशमी दसऱ्या निमित्त आमच्या घरी पेन, पुस्तक आणि माईकचे पुजन करण्यात आले. पारंपारिक शस्त्रांचे पुजन आजच्या दिवशी सगळीकडे केले जाते परंतु मी मात्र माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शस्त्र म्हणून काम करणाऱ्या या गोष्टींचे पुजन केले. आजच्या आधुनिक युगात या तीन गोष्टींवर प्रभुत्व असलं की कोणत्याही शत्रूशी दोन हात करता येतात. विचारांच्या लढाया खेळणाऱ्यांसाठी तर यापेक्षा भारी शस्त्रास्त्र दुसरं असुच शकत नाही. या शस्त्रास्त्रांचे वार अजरामर राहतात. पारंपारीक शस्त्र फक्त शरिराला जखमा करतात परंतु मनाला जखमा करण्याचे आणि वेळप्रसंगी ते भरून काढण्याचे सामर्थ्य मात्र शब्द आणि लेखणीमध्येच असते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत जेवढा उपयोग ढाली, तलवारी आणि तोफांचा केला असेल तेवढाच शब्द आणि लेखणीचा सुद्धा केला. वेळानुरूप ही शस्त्रास्त्रे वापरण्याचे कसब त्यांना जगातला एक महान राजा बनवण्यास कारणीभूत ठरलं. शिवरायांनी अनेक लढाया तलवारीवर जिंकल्या परंतु कधी कधी जे काम तलवार करू शकली नाही ते काम फक्त त्यांच्या एका पत्राने केले हे ध्यानात असावे. आज आपल्या राज्यघटनेनुसार विनापरवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा ठरतो परंतु मी वापरत असलेल्या शस्त्रांस्त्रांना मात्र घटनेने स्वातंत्र्य बहाल केलंय; त्यांचा योग्य वापर समाजमने बदलू शकतो आणि अयोग्य वापर रक्तांचे सडे सुद्धा पाडू शकतो. अर्थात एवढे सामर्थ्य यात आहे.

मित्रहो, भविष्यातल्या लढाया जर ढाली, तलवारी आणि बंदुकांनी लढल्या तर आपली कैद निश्चित आहे परंतु जर याच लढाया आपण ही आधुनिक शस्त्रांस्त्रे वापरून लढल्या तर आपला विजय निश्चित आहे. चला तर मग एका नव्या युगात पदार्पन करत असताना आपणही या शस्त्रांची कास धरूयात आणि स्वतःला व समाजाला विचाराने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूयात. ईतिहासात तलवारीचा वापर करून स्वराज्याला स्वातंत्र्य बहाल केलेल्या शिवरायांना, घटनेत कलम १९ (१) नुसार आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल केलेल्या भिमरायांना आणि शब्दनिर्मितीचे स्वातंत्र्य दिलेल्या जगतगुरू तुकोबारायांना माझा शतशः प्रणाम.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।१।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जन लोका ।।२।।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करू ।।३।।

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ ऑक्टोंबर २०१८ (विजयादशमी दसरा)