आज स्वप्निल तुपे या शिक्षकाने घरी येऊन पुस्तक भेट दिली. तसं पहायलं तर पुस्तक भेट स्विकारण्यासाठी मी लय हावरट माणूस आहे. माझ्या वाढदिनी देखील अनेक दोस्त मंडळींनी मला पुस्तके देऊनच शुभेच्छा दिल्या. तुपे सरनी सुद्धा १८ मे लाच यायचा चंग बांधलेला पण मी म्हणलं “कुठं उन्हा तान्हाचं येत बस्ताव, सवडीनं या तुमच्या” मग आज अखेर पुस्तक, टोपी, गमज्या आणि नारळ घेऊन सर घरी आले. टोपी घालुन, नामाटी ओढुन, खांद्यावर गमज्या टाकून हातात पुस्तक भेट दिले. माझ्या पत्र्याच्या घरात जेव्हा अशी दोस्त मंडळी निव्वळ प्रेमापोटी भेटायला येतात तेव्हा मला माझं घरं बंगल्याहुनबी भारी वाटतं. कारण मी माझ्या घराची किंमत त्या घरात किती भारी फरशी आहे आणि किती भारी दरवाजा आहे यावर मोजत नसुन त्या वसरीवर बसणारी माणसं किती आहेत आणि उंबऱ्याच्या बाहेर चप्पला किती आहेत यावर मोजत असतो. म्हणुनच मी स्वतःला लई श्रीमंत माणूस समजतो.

तुपे सरच्या दिलेल्या वैचारिक आहेराची परतफेड मी देखील ‘रिंदगुड’ देऊन केली. तुपे सर देशाच्या भविष्याचा पाया भरण्याचे काम करतात म्हणजेच ते ईयत्ता पहिलीचे शिक्षक आहेत तसेच ते उत्कृष्ठ सुत्रसंचालक देखील आहेत. शंभर टक्के अनुदानित शाळेवर शासणाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने फक्त वीस टक्के अनुदानाची पगार उचलून भारताला महासत्ता बणवण्यासाठी ते बाल भारताला घडवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्यासारख्याच महाराष्ट्रात तुटपुंज्या पगारावर भारताचा पाया बांधणाऱ्या तमाम शिक्षकांना माझा सलाम. आणखीन काही वर्ष जर आपल्या देशात ‘शिक्षक उपाशी आन् शासन तुपाशी’ अशी वेळ आली तर भविष्यात तेलबी गेलं आन् तूपबी गेलं असं म्हणण्याची वेळ आमच्यावर नक्कीच येईल.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ मे २०१८