जिथं आजची माणसं हयातीत रोजगार निर्मिती करू शकत नाहीत. तिथं छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतरही रोजगार देत आहेत यातच या व्यक्तिमत्वाचं थोरपण आहे. आज शिवजयंतीच्या फक्त एका दिवसात करोडो लोकांना रोजगार मिळतो. शिवजयंती साजरी करत असताना आपण शिवाजी महाराजांबद्दलची अस्मिता जोपासतो, त्यांना अभिमानाने मिरवतो परंतु यातून नकळत रोजगार निर्मिती होते. शिवरायांचे विचार पुस्तकातून, प्रबोधनातून, पोवाड्यातून, पारंपरिक मिरावणुकातून, पालखी सोहळ्यातून आजमितीस समाधानकारकरित्या समाजात झिरपत गेल्यामुळेच आज शिवजयंतीला वैश्विक स्वरूप प्राप्त झाले आहे.

कधीकाळी फक्त एक दिवस साजरी होणारी शिवजयंती आता शिवजयंती सप्ताहात रूपांतरित होत आहे. या सात दिवसात व्याख्याने, पोवाडे, किर्तने आणि मिरावणुकांसह अनेक समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन शिवजन्मोत्सव मंडळे करत आहेत त्या सर्वांचे कौतुक. या शिवजयंती सप्ताहात मंडपवाले, स्टेजवाले, साऊंड सिस्टीमवाले, फेटेवाले, घोडेवाले, झेंडेवाले, डिजिटलवाले, डॉल्बीवाले, ढोलपथकवाले, लायटिंगवाले, यू ट्यूबवाले, टिक टॉक वाले, यांसह शाहीर, व्याख्याते, मुर्तिकार, छायाचित्रकार, शिवचरित्रकार, शिल्पकार, कलाकार, याबरोबरच राहिल्या साहिल्या अशा असंख्य लोकांना शिवजयंतीतून रोजगार उपलब्ध होतो.

महापुरुषांचे कर्तृत्व का महत्वाचे असते, त्यांचे उदात्तीकरण का महत्वाचे, त्यांच्या जयंत्या का मोठ्या प्रमाणात साजऱ्या झाल्या पाहिजे याचे उत्तर वरील अनुच्छेदात सापडते. एका व्यक्तीला रोजगार मिळाला की त्याच्यावर अवलंबून असलेल्या संपूर्ण कुटुंबाचे पोट भरत असते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून जाऊन आज साडेतीन शतकांहून अधिक काळ झालाय तरी सुद्धा या व्यक्तीच्या नावात करोडो कुटुंबाचे पोट भरण्याचे सामर्थ्य आहे. “महाराज, या मातीवर वर मातीत निपजलेल्या प्रत्येक माणसावर तुमचे अगणित उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी आमच्या अगणित पिढ्यांचे जन्म जावे लागतील”.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १९ फेब्रुवारी २०२०