आज पाणी फाऊंडेशनच्या वाॅटरकप मध्ये सहभाग नोंदवलेल्या आमच्या बार्शी तालुक्यातल्या कोरफळे येथे दिड तास श्रमदान केले. झारखंडच्या कृषी संचालनालयाचे प्रमुख रमेश घोलप (भा.प्र.से) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमेद प्रतिष्ठाणच्या सहकाऱ्यांसमवेत श्रमदान करण्याचा योग आला. एक मे दिवशी व्यस्त वेळापत्रकामुळे महाश्रमदानास उपस्थित राहता आले नव्हते पण आज मात्र घोलप साहेब, तहसिलदार ॠषिकेश शेळके यांच्यासोबत श्रमदान केले.

गावकऱ्यांचा उत्साह पाहूण टिकाव आणि खोऱ्यावरचा जोर काकनभर जास्तच वाढला होता. लोकांच्या कष्टाच्या खुणा ओसाड माळरानावर ठळकपणे साक्ष देत होत्या, त्यातुनच प्रेरणा घेऊन आपलीही एखादी खुण असावी म्हणुन हात झटत होते. दिड तास श्रमदान करून खुप समाधान वाटले.

तसेच माझ्यासोबत श्रमदानासाठी आलेले डाॅ.धनंजय झालटे आणि हनुमंत हिप्परकर यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमदान केले. तसं पहायला गेलं तर श्रमदान करायला कारण लागत नाही परंतु आठवणीत राहावं म्हणुनच हे निमित्त. मी देखील आजचे श्रमदान लग्न जमल्याच्या आनंदात व घोलप साहेबांच्या आणि माझ्या दोस्तांच्या वाढदिवसानिमित्त केले. जिल्हाधिकारी रमेश घोलप साहेबांच्या अट्टाहासामुळेच आजच्या श्रमदानाचे भाग्य पदरी पडले त्याबद्दल त्यांस धन्यवाद. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन आणि कोरफळ्यातील तमाम जलमित्रांचे देखील आभार व धन्यवाद !
झारखंडला पोस्टींग असतानाही महाराष्ट्रात येऊन या काळ्या आईची सेवा करण्याचा साहेबांचा उपक्रम ईतर अधिकाऱ्यांसाठी अनुकरणीय आहे. स्वतःच्या कार्यक्षेत्राच्या चौकटी तोडुन या मातीचे ॠण फेडण्यासाठी साहेबांनी कोरफळ्यातील जलसंधारणाच्या कामासाठी श्रम,अर्थ आणि शब्द अशी त्रीसुत्री मदत करून एक आदर्श घालून दिलाय.

उमेद प्रतिष्ठाण फक्त स्पर्धा परिक्षांपुरतं मर्यादित नसुन ते ईतर सामाजिक उपक्रमातही अग्रेसर असते हे वाॅटर कपच्या निमित्ताने सर्वांमध्ये श्रमदानाची उमेद जागृत करून त्यांनी दाखवून दिलंय. सकाळी सहा ते नऊ या वेळेत येमाई देवीच्या परिसरात श्रमदानानंतर पार पडलेल्या एका छोटेखाणी सभेत मी उपस्थितांना शब्दांची उर्जा बहाल केली आणि श्रमदान करून गेलेली माझी उर्जा; घोलप साहेबांच्या मार्गदर्शनातुन घेऊन पांगरीकडे प्रयान केले. कामाची सवय नसल्याने आज रात्री थोडे अवदान येईल परंतु या त्रासापेक्षा केलेल्या कामाचे समाधान जास्त असल्याने झोप छान येईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ मे २०१८