प्रसंग -०१

काल सावरगावातले व्याख्यान संपवुन स्टेजच्या खाली उतरत होतो तोच एक श्रोता गर्दीतुन वाट काढत काढत पळतच स्टेजवर आला आणि मला घट्ट मिठी मारून बोलू लागला. “सर, लय झकास..एकच नंबर..पटलं बरंका…आवाजात दम हाय…” असे काहीसे तुटक तुटक शब्द. मला अलिंगन देऊनच त्यांना एवढा आनंद झाला होता की तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता. काही वेळापुर्वी एकदम अनोळखी असलेले चेहरे आपल्या तासभराच्या बोलण्यामुळे कायमचे आपलेच होऊन जातात याची प्रचिती मला अशा प्रसंगातुन खुप वेळा येते. विचारांच्या या जागरात असेही काही श्रोते भेटतात की ज्यांच भक्कम प्रेम मिळवणं खरंच खुप भाग्याचं होऊन जातं.

___________________________________________

प्रसंग – ०२

सरऽऽ…सर…थांबा.

नुकताच कार्यक्रम आटोपून मी निघालेलो गाडी कार्यक्रमस्थळापासुन जेमतेम २०० मिटर पुढे आली असावी तेवढ्यात पाठीमागुन हा आवाज आल्याने हनुमंतने तात्काळ गाडी थांबवली.

मी गाडीची काच खाली घेऊन पाठीमागे पाहिले तेवढ्यात एक श्रोता लागलीच गाडीजवळ आला. कौतुकाच्या भरात तो श्रोता बोलू लागला. सर..मला व्याख्यान लय आवडलं, तिथंच बोलायचं व्हतं पण म्हणलं कसं बोलाव म्हणुन हितवर आलो.
सर, माझ्या लहान पोरींना पुस्तकं द्ययचीत वाचायला तुमच्याकडं हैत का शिवाजी महाराजांची ?
मी त्यांना काही पुस्तकांची नावे सांगितली आणि ती पुस्तके मुलींना वाचायला द्या असे सांगितले.

व्याख्यानात वाचनाचा मुद्दा माझ्याकडून अतिशय प्रभावीपणे मांडला गेल्याने तो श्रोत्यांच्या डोक्यात किती फिट्ट बसला याची जाणिव या श्रोत्याच्या प्रतिक्रियेतुन आली. त्या श्रोत्याचे हात हातात घेऊन त्यांना धन्यवाद देऊन मी पांगरीकडे प्रयान केले.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ फेब्रुवारी २०१९
स्थळ : सावरगांव ता. तुजापूर