बायको म्हणजे संस्कार रुपी सिनेमातले हे एक असे पात्र आहे जिला आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, वहिनी, जाऊ, नणंद आणि पत्नी असे वेगवेगळे रोल प्ले करावे लागत असतात. या सगळ्या पात्रांना जी न्याय देते तिचा संसार सुपरहिट होतो. दोस्तांनो तुमचा हा सिनेमा लो बजेट आहे का हाय बजेट याचा फारसा संबंध नसतो फक्त संसारातल्या अभिनेत्रीची निवड मात्र महत्वाची ठरते. तसेही ही निवड आता आपल्या हातात म्हणावी तेवढी नाही राहिली, सद्य परिस्थितीत तर ‘त्याच’ ठरवतात कोणत्या सिनेमात काम करायचे आणि कोणत्या नाही.

या सिनेमातली काही पात्र जन्मजात कंपल्सरी असतात तर काही मात्र निवडावी लागतात. तसेही आयुष्य नावाचा अर्धा सिनेमा आईबापाच्या डिरेक्शन मध्ये आपण आधीच पूर्ण केलेला असतो त्यातच हा संसार नावाचा नवीन सिनेमा आपल्या डिरेक्शनमध्ये सुरू करायचा असतो. (काही काही सिनेमात कालांतराने ऍक्टरच डिरेक्टर होतात तो भाग वेगळा) सरतेशेवटी सांगायचं एवढंच की संसाररूपी या सिनेमात प्रत्येकाची डिरेक्शन ठरलेली असते. ज्याचा त्याचा रोल स्क्रिप्ट प्रमाणे प्ले केला की शुटिंग वेळेत पूर्ण होते. लव्ह, ड्रामा, ऍक्शन, इमोशन, सस्पेन्स, थ्रिल, कॉमेडी, इन्स्पिरेशन हे सगळं अनुभवायला लावणारा एकमेव चित्रपट म्हणजेच ‘संसार’ होय.
प्रिय विरा, तू आपला संसार सुपरहिट केल्याबद्दल धन्यवाद.

आता तुम्ही म्हणाल की विशाल गरड बायकोच्या वाढदिवसाला हे असे सिनेमॅटिक का बरं लिहायलाय. तर त्याचं असं आहे की; गेल्या काही महिन्यांपासून माझ्या डोक्यात सिनेमाचे फॅड घुसलंय, जोवर ते एकदा पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यात तयार होणाऱ्या प्रत्येक विचाराला त्या सिनेमाचा फ्लेवर आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा बायकोला वाढदिवसानिमित्त द्यायच्या शुभेच्छा तरी त्याला कसा बरं अपवाद ठरतील म्हणून हा लेखप्रपंच. बाकी या सिनेमातली सर्व पात्र वास्तव असतात यांचा जीवनाशी घनिष्ट संबंध असतो. योगायोग वगैरे क्वचित असतो बहुतांशी तर ठरवूनच असतं. तेव्हा रिल लाईफ मध्ये कुणी करो अथवा ना करो पण रिअल लाईफ मध्ये मात्र हा सिनेमा प्रत्येकाला (लग्न करण्याची इच्छा असलेल्यांना) करावाच लागतो.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२०