पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस सरांची आज सदिच्छा भेट झाली. दोस्त पत्रकार प्रविण डोके आणि अविनाश पोफळेंना भेटण्यासाठी आज सकाळ कार्यालयात गेलो तेव्हा अविनाश म्हणाला “चल तुला सकाळची लायब्ररी दाखवतो”. दोघेही लायब्ररीत गेलो तर तिथे सम्राट सर वाचत बसले होते. खरंतर त्यांना भेटण्याची खूप दिवसांची इच्छा होती पण ती अशी नकळत पूर्ण होईल असे वाटले नव्हते. वाचणप्रिय, अभ्यासू आणि व्यासंगी माणसाला मोकळ्या हाताने भेटणे बरोबर नाही वाटणार म्हणून अविनाशला तिथेच थांबवून मी गाडीतले माझे पुस्तक आणायला बाहेर गेलो, धावतच पुस्तक घेऊन आलो तोच सम्राट सरांना नमस्कार घातला आणि माझे पुस्तक त्यांच्या हातात टेकवले. अविनाशने माझी ओळख करून दिली आणि मी सरांना दिलेल्या पुस्तकाने ती अधोरेखित झाली.

एक लेखक लायब्ररी पाहायला आलाय ही गोष्ट सम्राट सरांना भावली. त्यांनी संपूर्ण लायब्ररी मला फिरून दाखवली, दाखवता दाखवता प्रत्येक गोष्टीची ते माहिती देत होते. सकाळ वृत्तपत्राला नव्वद वर्षाचा समृद्ध वारसा आहे तितकाच मोठा वारसा त्यांच्या लायब्ररीला सुद्धा आहे. तिथल्या पुस्तकांवर नजर टाकताना जुन्या पुस्तकांचा येणारा विशिष्ठ सुवास माझ्यातल्या वाचकाला उत्तेजित करणारा होता. तुडुंब भरलेल्या विहिरीत मनसोक्त पोहण्यासाठी उडी मारावी तशी गत माझी झालती. एखाद्या राजाने हाताखाली प्रधान, मंत्री, सचिव, सेवक असताना स्वतःच फिरून त्याचा राजवाडा दाखवावा एवढं अप्रूप मला सम्राट सरांचं वाटलं.

सरांबद्दल आजपर्यंत खूप ऐकून आणि वाचून होतो. पण त्यांना अनुभवण्याची ही पहिलीच वेळ. एखादा मुद्दा राजकीय असो, सामाजिक असो वा इतर पण  त्याच्या दोन्ही बाजू अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्याची त्यांची वृत्ती मला फार भावते. आज कुणीतरी काहीतरी स्टेटमेंट केले होते, त्याचा संदर्भ शोधण्यासाठी सम्राट सर वाचत बसले होते. ज्या दैनिकाकडे असा अपडेटेड संपादक असेल त्या दैनिकाच्या भविष्याची चिंता कसली. एका आघाडीच्या दैनिकाच्या संपादकाने माझ्यासारख्या युवा लेखकाला दिलेला सन्मान खरंच बळ वाढवणारा होता. “प्रिय सर, तुम्ही फक्त नावाने नाही तर बुद्धीने आणि मनाने सुद्धा सम्राट आहात. पहिल्याच भेटीत माझं मन जिंकलंत तुम्ही, एक दोन भेटीत आता नाही पोट भरणार; वाचनाची आणि लेखनाची माझी पण भूक मोठी आहे. आता भेटत राहू पोटभरून”.

विशाल गरड
दिनांक : ११ जून २०२१