प्रसिद्ध फोटोग्राफर सचिन प्रताप नलावडे यांनी आज माझ्या पांगरी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्वसामान्य चेहऱ्यांना स्वतःच्या हटके अशा सचिन स्टाईलने कॅमेऱ्यात कैद करून त्यावर एडिटिंगचे शिंपडन मारून त्या चेहऱ्यांना ग्लॅमरस लूक प्रदान करणारा हा अवलिया टॅलेंटचा बादशहा आहे. फोटोग्राफीसाठी फक्त स्किल असून उपयोग नाही त्यासोबत तशी यंत्र सामग्री सुद्धा असावी लागते म्हणजे फोटोग्राफीला न्याय देता येतो. सचिनला हे चांगले ठाऊक असल्याने फोटोग्राफीतली ए.के फोर्टीसेवन दर्जाची अद्ययावत सामुग्री त्याने त्याच्या भात्यात ठेवली आहे.

तशी सचिनची आणि माझी मैत्री फार जुनी पण दोघांच्या व्यस्त कामामुळे भेटणे तसे कमीच. बीड शहरात कधी व्याख्यानाला गेलो की सचिनची भेट घेणे हा जणू प्रोटोकॉल असतो माझा. थोडीशी मान हलवत हलवत खळखळून हसणारा सचिन फोटोग्राफीतलं एक भन्नाट रसायन आहे. सदा हसतमुख राहणारा हा माझा दोस्त सध्या प्री वेडिंग शूट मध्ये बिझी आहे. कालच तो पुण्याहून आलाय, उद्या बीडला जाऊन लगेच त्याला साताऱ्याला जायचे आहे.  यावरून त्याच्या फोटोग्राफीची मागणी लक्ष्यात येते. फोटोग्राफी करता करता बी.एफ.एम च्या माध्यमातून सचिन आणि त्याची टिम दर्जेदार नाटके आणून आम्हा बार्शीकारांचे नाट्यभूक भागवत आलेत.

माझ्या हृदयांकित या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध इलस्ट्रेटर उदय मोहितेनी बनवले होते त्यासाठी लागणारा फोटो सचिनने काढला होता. या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली तेव्हापासून जुळलेली ही मैत्रीची नाळ सचिनने कायम ठेवली आहे. आता लवकरच इंगित प्रॉडक्शनच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सचिन त्याच्या सिनेमॅटोग्राफीचे योगदान देणार आहे. त्याबद्दल आत्ताच सगळं सांगणे अगत्याचे ठरेल. पण जे ही काही असेल ते त्याच्या आणि माझ्या नावाला शोभेल असेच असेल हे मात्र नक्की. तोपर्यंत जस्ट वेट.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १० नोव्हेंबर २०२०