सध्या लोकसभेच्या ईलेक्शनमुळे सर्वच राजकिय पक्षांच्या सभा सुरू आहेत. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या निवडणूकीच्या निमित्ताने सर्वसामान्य मतदार मात्र उन्हाच्या तडाख्यात होरपळत आहे. बड्या नेत्यांच्या सभांना गर्दी करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेतेमंडळी झटत असताना सभांचा दुपारचा टायमिंग अंगाची लाही लाही करतोय पण चोविस तास एसी आणि हेलिकॅप्टर मध्ये फिरणाऱ्यांना आसल्या उन्हाच्या कारात दोन तीन तास भाषणे ऐकत बसतानाचा त्रास कधी कळणार ? सभांच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला दोन तीन तास ताटकळत लावायचं हे पटतंय का ? स्टेजवर फॅन, कुलर, थंड पाण्याच्या बाटल्या, सावलीसाठी छत अशा शाही ईतमामात तास दोन तास बोलायला त्यांचं काय जातंय पण त्यांना ऐकताना मतदारांना होणारा त्रास कोण मोजणार ?

बेरोजगारी वाढल्याने पाचशे रूपये रोज मिळाला तरी लोकं प्रचाराच्या कामाला जात आहेत. स्वयंस्फुर्तीने पदर झळ सोसुन प्रचार करणारेही तितकेच आहेत. सभांची सगळी गर्दी स्वयंस्फुर्तीने झालेली नसते त्यात भरपूर पैसे पेरावे लागतात हे वास्तव आहे. नेतेमंडळी पाखरासारखे गिरट्या घालत येतात आणि भाषणे करून भुर्रर्रकन उडुनही जातात पण सकाळी दिवस उगवायला घराबाहेर पडलेला मतदार दिवस ढळेपर्यंत घरी पोहचत नाही. मुळात समाजप्रबोधनपर व्याख्यानांना गर्दी नाही करायची पण सभा म्हणलं की मुरकंड पाडायची ही पुर्वापार सवयच लागली आहे आपल्याला. राजकीय भाषणांचा जर योग्य उपयोग केला तर प्रबोधनाचा महाजागर निर्माण होऊ शकतो पण वास्तवात मात्र टिका, टिपन्न्या, नकला, धमक्या, आश्वासने, हेवे दावे, यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं यापलिकडे फारसं काही नविन पदरी पडत नाही हे दुर्देव.

निवडणूकांत असलेले सभांचे महत्व मी जाणतो, त्यातुन होणाऱ्या शक्तीप्रदर्शनाला अजुनही महत्व आहे हे ही तितकंच खरंय परंतु त्याचबरोबर; ज्यांच्या उपस्थितीवर आणि समर्थनावर आपला राजकीय पिंड पोसला जातो, ज्यांच्या टाळ्यांवर आणि घोषणांवर आपली भाषणे पोसली जातात त्यांच्या जिवाची काळजी करणं हे हर एक पुढाऱ्याचे कर्तव्य असायला हवे त्यात फक्त व्यवहार नसावा एवढीच अपेक्षा.

लेखक : विशाल गरड (सामान्य मतदार)
दिनांक : ०९ एप्रिल २०१९