पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वतीने देण्यात येणारा ग्रंथप्रेमी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार नुकताच मला जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण येत्या २६ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील चिखली येथे होत असलेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ व ग्रंथभेट असे ह्या पुरस्काराचे स्वरुप असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथनिवड समितीचे सदस्य प्राचार्य हरिदास रणदिवे यांनी निवडपत्राद्वारे दिली आहे.
ज्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या जोरावर मी माझं मन, मेंदू आणि मनगट सशक्त केलं. अशा ग्रंथालयाकडून माझ्यासारख्या नवोदित लेखकाचा “विभागीय साहित्य पुरस्कार” देऊन होत असलेला सन्मान माझं बळ वाढवणारा तर आहेच, यासोबतच नवलेखकांनाही तो प्रेरणा देणारा आहे. हा पुरस्कार फक्त माझा नसुन ‘रिंदगुड’ लिहित असताना मला शब्द सुचण्यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या प्रत्येक सजिव निर्जिव व्यक्तींचा व वस्तूंचा आहे. हा पुरस्कार म्हणजे लेखन आणि वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धींगत करण्यासाठी माझ्या सारख्या युवालेखकावर टाकलेली सामाजिक जबाबदारी आहे जिचे पालन करण्याचा मी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन. धन्यवाद !