आमच्या गल्लीत राहणारे राजा गाढवे उर्फ पुढारी (आमच्या पेठेतले हे गाजलेले टोपणनाव आहे) आज त्यांची नात वेदिकाला घेऊन घरी आले होते. आई नोकरीत असल्याने सध्या वेदिका रायगडला शिकत आहे. उन्हाळा सुट्टीमुळे आईवडीलांसोबत मुळ गावी आली आहे. पर्वा रस्त्यावर भेटल्यावरच मला पुढारीने नातीचे कौतुक सांगितले होते. “ईशाल, पुरगी लय झकास बुल्ती आक्शी तुज्यावाणी बग, शिवाजी महाराज आन् बाबासाहेब आंबेडकराची तर भाषणं लय जोरात करती. उद्या घिऊन येतू तुज्याकडं, चार गुष्टी सांग जरा तीला” ठरल्याप्रमाणे ती आज घरी आली. मी तीला भाषण करायला सांगीतले की लगेच कसलाही न्यनगंड न बाळगता अतिशय धाडसाने ती भाषण करायला लागली. स्वच्छ उच्चार, मधुर आवाज, चेहऱ्यावरील हावभाव सगळंच एकदम मस्त होतं. रायगडाच्या मातीचा गुणच ईतका भारी आहे कि ईथल्या ईवल्याशा लेकरावर देखील शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतिबिंब उमटते, याची झलक वेदिकाच्या वक्तृत्वातुन पहायला मिळाली.

विशेष म्हणजे महापुरूषांच्या चरित्रावरील सर्व भाषणे ती स्वतः तयार करते. ईतरांनी लिहून दिलेलं पाठांतर करून बोलण्यापेक्षा वेदिका स्वतः भाषणे लिहिते याचे कौतुक वाटले. वडील सिद्धेश्वर गाढवे हे शेतकरी व आई शिक्षिका त्यामुळे श्रमाचा आणि विद्येचा जाज्वल्य वारसा लाभलेल्या वेदिकाची जडणघडण शिवरायांच्या रायगड भुमीत अतिशय दमदार होत आहे हे तीच्याशी साधलेल्या संवादातुन कळले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांवर सुरेख भाषण करून आम्हा सर्वांची मने जिंकल्याबद्दल मी वेदिकाला माझं ‘रिंदगुड’ हे पुस्तक बक्षीस म्हणून भेट दिलं. नातीचं एवढं कौतुक पाहुण पुढारीचं डोळं डबडबलं.

खुप वेळ गप्पा झाल्यानंतर मी पाणी पिण्यासाठी थोडे स्वयंपाक घरात गेलो तोवर पुढारीने पोरीच्या हाताला धरलं आणि उंबरा ओलांडून त्यांच्या घराकडं निघाले तेवढ्यात काहितरी बोलायचं राहिलं म्हणुन मी लगेच उंबऱ्याजवळ येऊन बोललो “अयं पुढारी, पोरगी लय हुश्शार हाय बगा, भाषणासोबत आवाज पण गोडंय तीजा सोबत डान्सबी भारी करती, तवा परिक्षेत चार मार्क कमी पडलं तरी चालत्याल पण पोरगी घराचं नांवलौकीक वाढवलं हे नक्की” पुढारीनं व्हय व्हय ईशाल असं म्हणुन गिरकी मारली आणि वाट चालू लागले. थोडंसं पुढे जाऊन उजव्या हाताने छातीला कवटाळुन धरलेले पुस्तक आणि डावा हात आजोबांच्या हातात अशा अवस्थेत मागे वळून मोठ्ठ्याने थँक्यू मामा म्हणलेल्या वेदिकेला “ऑल द बेस्ट बेटा” म्हणुन मी पण घरात वळलो. “वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा” का कुनास्ठाव पण या वेदिकाला आणि राजाभाऊ ला पाहून हे गाणं मला आठवलं. या गाण्याचा आणि त्यांच्या भेटीचा उगांच अर्थ लावत-लावता डोळा कधी लागला कळलंच नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ मे २०१८