सैराटच्या नावानं चांगभलं हा कार्यक्रम मनलावून बघीतला. आजवर एक अद्वितीय दिग्दर्शक म्हणुन नागराज आण्णा मंजुळे यांची केलेली भक्ती जणू हा कार्यक्रम पाहुण ते पावल्याचे समाधान लाभले. सिनेमा क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम एक अध्याय आहे; नव्हे तो एक अभ्यासक्रमच आहे असंच म्हणने योग्य ठरेल. हा कार्यक्रम आण्णांनी थेटरात जरी चार भागात रिलीज केला असता तरी सैराट एवढा चालला असता पण सैराटची ही गोष्ट आण्णांना प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगायची होती म्हणूनच त्यांनी हा अट्टाहास झी टाॅकीजवर केला.

लोकांना पडद्यामागच्या गोष्टींचे कुतुहल चित्रपटापेक्षाही जास्त असते; नेमकं हेच हेरून नागराज आण्णांनी अगदी सैराट मेकींगच्या पहिल्या दिवसापासुनच याची तयारी केलेली होती. भविष्यातल्या मोठ्या स्वप्नांची पायाभरणी कशी करतात हे आण्णांनी दाखवून दिलंय. आजपर्यंत पडद्यामागच्या एवढ्या लहान सहान गोष्टी कुण्या दिग्दर्शकाने सर्वांसमोर खुल्या दिलाने मांडलेलं मी तरी पाहिलं नाही. आपली फिल्म मेकिंगची स्टाईल कोणी तरी काॅपी करेल, आपलं अनोखं वेगळेपणा कोणी तरी चोरेल अशा गोष्टीना फाट्यावर हाणून आण्णांनी हे पडद्यामागचं जिवंत जगणं डिटेल मांडलंय. आर्ची, परशा, सल्या, आणि बाळ्या हे चित्रपटात हिरो झालेत पण चांगभलं मुळं त्यांच्यासंबंधीच्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू सुद्धा हिरो झाल्यात.

आण्णा, तुम्ही तुमचं जगणंच मांडलंत. हे सारं बघुन आता तुम्हाला कधीच नाही भेटलं, बोललं आणि पाहिलं तरी चालतंय. कारण भेटल्यावर जे बोलायचं होतं, जे विचारायचं होतं आणि तुमच्याकडुन जे ऐकायचं होतं ते सारं तुम्ही या चांगभलं मधून घरबसल्या पोहचवलंत. बरेच चित्रपट निघतात पण तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांना कुणी उत्तर देत नाहीत. पण आण्णा तुम्ही मात्र चांगभलं नावाचं गाईड घरात आणून ठेवलं. या चार एपिसोड मधून प्रत्येकालाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच सापडली असतील. माझ्या सारख्या करोडो चाहत्यांची तुम्हाला भेटण्याची ईच्छा याच कारणामुळे होती. त्या करोडोंना तुम्ही भेटू शकत नाहीत पण टि.व्ही च्या माध्यमातुन प्रत्येक घरात जाऊन तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल तुमचे, गार्गी कुलकर्णींचे आणि संपुर्ण टिमचे मनस्वी आभार.

द्रोणाचार्यांनी जसे अर्जुनाला नेम धरायला लावल्यावर त्याला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता अगदी तसंच आण्णा नावाच्या द्रोणाचार्याने प्रत्येक श्रोत्याला टि.व्ही वर नेम धरायला लावला. आता टि.व्ही पाहणारा हरएक प्रेक्षक अर्जुन होऊन बसलाय, खरंच आण्णा, नजर हटत नव्हती राव स्क्रिनवरची. सजीवांसोबत निर्जिवांनाही अमरत्व बहाल करणाऱ्या आण्णा नावाच्या कलादेवतेला माझा सलाम !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० मे २०१८