समाजातील तथाकथित ‘संस्थाचालक’ या बिरूदावलीला अपवाद असणारं हे व्यक्तिमत्व. संस्था स्थापन केली म्हणून ते संस्थापक बाकी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वडिलांसमान प्रेम देणारे सोनवणे सर हे एक स्वायत्त विद्यापिठच आहेत. या विद्यापिठात प्रवेश घेतलेला प्रत्येक प्राध्यापक सरांकडून मिळालेला आदर आणि प्रेम कधिच विसरू शकत नाही. माझ्या सर्व्हिसला सात वर्ष झाली परंतु या सात वर्षात मला एकदाही आपण कुणाचीतरी नोकरी करतोय ही भावना मनात आली नाही. ज्या पद्धतीने सरांनी या संस्थेत आम्हाला वागणूक दिली ती अभिमानास्पद आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक संस्थांमध्ये मी गेलो परंतू सोनवणे नावाचं हे संजिव रसायन कोणत्याच प्रयोगशाळेत दिसलं नाही.

नोकरी लावण्यासाठी पैसे घेणाऱ्या, शिक्षकांना बदलीची भिती दाखवणाऱ्या, विद्यार्थ्यांचा निकाल सोडून फक्त त्यांच्या फी मध्ये इंट्रेस्ट असणाऱ्या, शिक्षकांच्या पगारीतुन एक पगार स्वतःच्या वाढदिवसासाठी कापून घेणाऱ्या, संस्थेच्या शिपायांना घरची आणि शेतातली कामे लावणाऱ्या, विद्यार्थ्यांशी कधिच न भेटणाऱ्या तथाकथित संस्थाचालकांच्या या अशा वाईट वृत्तीला पायाखाली गाढुण एकही रूपया न घेता नोकरी देणारा, शिक्षकांचा आदर ठेवणारा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी खर्च करणारा, गरिब मुलींची फी स्वतः भरणारा, शिक्षकांच्या वैयक्तीक अडचनीत आर्थिक मदत करणारा, प्राध्यापकांना शिकवण्याचे स्वातंत्र्य देणारा आणि विद्यार्थ्यांशी रोज संवाद साधणारा सोनवणे सरांसारखा संस्थापक निर्माण होणे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतलं आश्चर्य आहे.

सध्या राजकारणातल्या ‘निष्ठा’ नावाची टिंगल होत असताना, आम्हाला कायमच सत्तेत ठेवणाऱ्या सोनवणे सरांवरची आमची ‘निष्ठा’ आजही तेवढ्याच ताकदिने टिकून आहे यातच त्यांचे नेतृत्व सिद्ध होते. सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ‘प्राध्यापक’ पक्षाने महाविद्यालय मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मोठा विकास केला आहे ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्य घडवलंय. पुढेही हा विकास असाच सुरू राहील. माझ्या सारख्या कित्येकांच्या आयुष्यात यशाची पहिली पायरी तयार करून दिलेल्या, आमचा संसार उभा केलेल्या, आमच्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या सोनवणे सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

प्रिय सर, तुमचं आजवरचं संपुर्ण आयुष्य आपल्या संकल्प परिवारातील हरएक व्यक्तीस प्रेरणास्थानी आहे. आपण आम्हास असंच मार्गदर्शन करत रहा, ‘पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा’ असं मी तुम्हाला म्हणूच शकत नाही कारण आजही तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून लढत आहात. ज्या वयात लोकं रिटायर होतात त्या वयात तुम्ही नवनविन शैक्षणिक संकुलं उभी करत आहात. तुमचं हे स्वप्न पाहण्याचं आणि ती पुर्ण करण्याचं वेड आमच्यासाठी युरॅनिअमचा साठा आहे. ते तुमच्या शंभरीपर्यंत असंच ज्वलंत राहो आणि ही सामर्थ्यशाली सोबत दिर्घायुषी होवो याच माझ्या सदिच्छा !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
डाॅ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव
दिनांक : ०३ सप्टेंबर २०१९