महाराज खरंच तुमच्या सुद्धा फोटोचा आणि पुतळ्यांचा कॉपीराईट असायला हवा होता. सतराव्या शतकात तुमचा एकही फोटो कुणाकडे नव्हता; ना तुमचा अश्वारूढ पुतळा कुठे उभा होता. तेव्हाच्या मावळ्यांना त्याची गरजच नव्हती कारण तुमचा फोटो त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयावर छापला होता. पण काळ बदललला तंत्रज्ञानाच्या या युगात तुमचे मोठमोठे होर्डिंग्ज लागायला लागले, भव्य दिव्य स्मारके उभारली जाऊ लागली अर्थात साडे तिनशे वर्षानी देखील तुमच्या लोककल्याणकारी राज्याचा विचार सर्वांच्या डोक्यात मुरला गेला आणि त्यातून उत्पन्न झालेल्या प्रेमाची निशाणी म्हणजेच ही स्मारके उभी राहिली.

महाराज, तुमचा आणि तुमच्या विचारांचा सरळ सरळ विरोध केला जाईल असे रक्त या मातीत जन्माला येऊ शकत नाही पण हल्ली तुमच्या फोटोंचा आणि पुतळ्याचा वापर त्यातून प्रेरणा मिळवण्याच्या पलीकडे जाऊन काही लोकांकडून फक्त निवडणूक लढवण्यासाठी, समर्थन मिळवण्यासाठी, लोकांची माथी भडकवण्यासाठी आणि दंगली घडवण्यासाठी केला जातोय याचे दुःख वाटते. आज तुम्ही असता तर आम्हाला म्हणला असतात “अरे,मी त्या निर्जिव गोष्टीत नाही तर तुमच्या सजीव शरीरात राहतो, जर महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना झाली आणि या कृत्यातून उसळलेल्या दंगलीत जर तुमचे रक्त सांडले तर ते मला कदापि आवडणार नाही. जोपर्यंत मी तुमच्या डोक्यात जिवंत आहे तोपर्यंत माझी विटंबनाच होऊ शकत नाही.”

महाराज, तुमचं म्हणणं पटतंय ओ आम्हाला पण आज तुम्ही आमच्यात नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला त्या स्मारकात पाहतो, तुमची प्रत्येक प्रतिकृती आमच्यासाठी जिवंतच असते. एवढंच काय; तुमचे नाव असलेली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी सन्मानाची आणि अभिमानाची असते. त्यामुळे अशा गोष्टींना जर कुणी चुकीच्या उद्देशाने धक्का लावला तर त्याचा आम्हाला कडेलोट करावा वाटणे साहजिकच आहे. पण याच मातीत फक्त राजकारणासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी तुमच्या प्रतीकांचा वापर केला जात असेल तर अशा प्रवृत्तीला वेसण घालणे आत्ताच्या लोकशाहीला अशक्य वाटते.

महाराज, सामोरा समोर विरोध करून नंतर उपरती झालेल्यांना तुम्ही इतिहासात माफी दिली आहे. पण आजच्या या कलियुगात लोकांसमोर तुमचा जयजयकार करायचा आणि वेळ पडली की तुमच्याच मूर्त्यांवर वार करायचा, दंगली घडवून सत्तेची भाकर भाजायची, सगळी तत्व खुंटीवर टांगायची, तुमचा इतिहास न वाचलेल्यांची माथी भडकवायची अशा प्रवृत्तींना तुमच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या करोडो शिवभक्तांकडून कदापी माफी नाही आणि हा शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तुमच्याकडूनही त्यांना माफी नसेल याची खात्री आहे.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३ मार्च २०२१
संपर्क : ८८८८५३५२८२