हिंगणघाट काय अन कोपर्डी काय,
कधी जाळून मारतील तर कधी बलात्कार करून.
मारणाऱ्यालाही एक पक्क माहित आहे मी लगेच मरणार नाही.

काळ बद्दललाय, माणसं बदलली तश्या त्यांच्या मानसिकताही बदलत गेल्या पण न्यायव्यवस्था अजून म्हणावी तशी बदलली नाही.

घटना घडणार, फेसबुक व्हाट्स ऍप निषेधांच्या पोस्टनी भरून वाहणार. मेणबत्त्या जळणार, मोर्चे निघणार, दुकाने बंद होणार. काही दिवसांनी, महिन्यांनी हे पुन्हा करावे लागणार.

नेहमीच पहिल्या गियर वर चालणाऱ्या न्यायव्यवस्थेने अश्या भयंकर घटनांसाठी तरी निदान टॉप गियर टाकायला हवा.

बलात्कार रोज होण्याच्या, मर्डर रोज होण्याच्या, खूप घटना आहेत पण नराधमांना फाशी झालेल्या घटनाच हल्ली घडत नाहीत. हेच खरं दुखणं आहे.

हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकही निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे हे तर मी पण वाचलंय ओ, पण ते सुटलेले हजार किती निरपराध्यांना मारत असतील याचा विचार छळतो अक्षरशः

हे माननीय न्यायदेवते तुला एवढंच मागणे आहे. मान्य आहे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे पण तरीही अश्या घटनांचे निकाल देऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंत तुझी पट्टी थोडीशी सैल ठेवत जा. पोरींच्या आत्म्यास शांती मिळेल गं.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड – पांगरीकर
दिनांक : १० फेब्रुवारी २०२०