दुधात मिठाचा खडा पडावा आणि क्षणात दूध नासावं तसं गेल्या महिनाभरात सभोवतालचे वातावरण नासले आहे. अनेक जवळचे नातेवाईक कोरोनामुळे गमवावे लागले. अजूनही काहीजण हॉस्पिटलमध्येच ऍडमिट आहेत. एखादा दिवस अपवाद वगळता रोजच कुणी ना कुणी पॉझिटिव्ह निघाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. वेळीच निदान करणारे घरी क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत तर ज्यांनी दुखणे अंगावर काढले त्यांच्यासाठी बेड आणि इंजेक्शन मिळवता मिळवता नाकी नऊ येत आहेत. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकजण अनुभवतो आहे. आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा व्हेंटिलेटरवर असते तेव्हा आपल्या मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल जणू यम देवाचा निरोप वाटू लागतो. मातीला जाणे, सावडायला जाणे, दहाव्याला आणि तेराव्याला जाणे हे जणू रोजची रुटिंग झाली आहे.

सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक येत असतात तो मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आजचे दिवस जरी दुःखाचे असले तरी सुखाचे दिवस पुढे वाट पाहत असतील हेच सांगून स्वतःच्या मनाची समजूत घाला. गमावलेल्या माणसांच्या स्मृती जिवंत ठेवा आणि काळजी घेऊन स्वतःलाही जिवंत ठेवा. निष्काळजी करून परत धावाधाव करण्यापेक्षा काळजी घ्या, आजार अंगावर काढू नका. ताप आणि अंगदुखी असतानाही जर टेस्ट करायला उशीर केला तर मग तुम्ही यमदेवाच्या टप्प्यात आलेच म्हणून समजा. रोगराई आली की गोळ्या, सलाईन, इंजेक्शन, लस हे औषधे म्हणून वापरली जातात पण जेव्हा काळंच वाईट येतो तेव्हा ‘वेळ’ हेच सर्वात प्रभावी औषध असतं पण त्यासाठी किंमतही तितकीच मोठी मोजावी लागते जी आपण मोजली आहे. निसर्ग जसा रागावतो तसाच प्रेमही करतो तेव्हा खात्री बाळगा ‘ही वेळ निघून जाईल.’

विशाल गरड
दिनांक : १४ मे २०२१