आमचं दादा तसं पेशाने शिक्षक, आवडीने राजकारणी आणि परंपरेने शेतकरी. ही त्रिसुत्री त्यांनी कधीच सोडली नाही. सतरा माणसांचे खटले सांभाळत त्यांनी नोकरी केली, नोकरी करता करता शेती केली आणि शेती करता करता राजकारण केले. बहुआघाड्यावर काम करणारा बाप पाहूण माझ्यावर देखील त्यांचाच प्रभाव पडत राहिल्याने पुढे मला देखिल बहुआघाड्यांवर काम करायची सवय लागली याचे श्रेय दादांनाच जाते. मी लहान असताना राजकिय नेत्यांच्या सभांना ते मला सोबत घेऊन जायचे, चित्रकलेच्या वह्या आणुन द्यायचे, वाचण्यासाठी पुस्तके आणायचे. दादांनी माझ्यावर बालवयात केलेले हे संस्कार, मला समाजात माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायला उपयोगी ठरले.

मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, न परवडणारी शेती आणि प्रामाणिक राजकारणामुळे दादांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. पण यातल्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देत त्यांनी कुटुंबातली सर्व मुलं मुले उच्चशिक्षित केली, मुलींची सोयरिक चांगल्या घरात केली, शेतीमुळे झालेले नुकसान आण्णा अणि आबांच्या साथीने अहोरात्र कष्ट करून शेतातुनच भरूण काढले. राजकारणातल्या जय पराजयाने कधीच खचले नाहीत. आमच्या एकत्र कुटुंबाचा हा ‘विजय’ नावाचा खांब अनंत संकटांना तोंड देत सतत विजयी होत राहिला. आज जरी मी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहिलो असलो तरी आमच्या दादांच्या हाताला धरून अजूनही चलावं वाटतंय. बापाच्या सावलीत जगायची मजाच काही और असते. दादा शतायुषी व्हा !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०१ जून २०१९