फटाकड्यांचे कितीबी प्रकार येऊ द्या पण याची दहशतच वेगळी. बालपणी अॅटमबाॅम्ब उडवणे म्हणजे मोठं झाल्याचे लक्षण होतं. अंगणवाडी बालवाडीत फुलबाजे, झाडे, प्राथमिक शाळेत असताना टिकल्या आणि नागगोळ्या, माध्यमीक शाळेत गेलो की लवंगी फटाकड्या किंवा तोटे आणि काॅलेजला गेलो की सुतळी बाॅम्ब असे काहिसं वर्गीकरण होतं आमचं. त्यातबी लहान असतानाच मोठ मोठे सुतळी बाॅम्ब फोडणारी पोरं अशी माचो वाटायची त्यांनाही असे मोठे बाॅम्ब फोडले की आपण प्रचंड धाडसी धैर्यवान झालो असंच वाटायचं.

दिवाळीच्या काही दिवस आधीच अंबिका सायकल मार्ट समोर आताराचे फटाक्याचे दुकान उभारायला सुरूवात व्हायची. शाळेतुन येताना दुकान उभारण्यासाठीची ती लाकडं आणि पत्रे दिसले की आनंदाचे उधान यायचं. पुढे दुकान फटाक्यांनी भरलं की शाळेतुन येतान निदान तास दोन तास तरी टाचा वर करून त्या दुकानातले सगळे फटाकडे न्याहाळणे जणू नित्याचे असायचे. त्यातच खुप वेळ थांबलो की दुकानाचे मालक एखादा अॅटमबाॅम्ब फुकट उडवायला द्यायचे अर्थात शाळेत असतानाच घरच्यांना चुकवून अॅटमबाॅम्ब उडवायला मिळायचा म्हणुन थांबायचो. तसेच गावातली काही श्रीमंत मंडळी तिथे खरेदीला आली की त्यांची फटाके भरलेली पिशवी पाहूण हेवा वाटायचा.

आमच्या दादा किंवा आण्णांसोबत फटाके घ्यायला गेलो की फटाक्याचे बजेट दिडशे ते दोनशे रूपये असायचे. यातच मग सगळे आयटम निदाना दोन दोन तरी आले पाहिजे म्हणुन फटाक्यांची रितसर यादीच तयार असायची. त्यात प्रत्यक्ष खरेदीला गेलो की निम्मी यादी कॅन्सल व्हायची. आणलेले सगळे फटाके कपाटाच्या मागच्या दिवळीत लपवून ठेवायचोत. सकाळचे अभ्यंगस्नान निमित्तमात्र असायचे फक्त नविन कपडे घालुन, उदबत्ती पेटवली की आनंदाचे उधान यायचं आणि मग सारवलेल्या ओट्यावर लक्ष्मीतोट्यांच्या कागदांचा ढिग पडायचा. सकाळी झाडताना कचऱ्याबद्दल आणि गवळणीत उडवलेल्या राॅकेटबद्दल आईचे रागावणे खायला लागायचे तो भाग वेगळा.

कपाटाच्या दिवळीत लपवून ठेवलेल्या फटाक्यांच्या फिक्स डिपाॅझिटची एफडी मग पुढे तुळशीच्या लग्नादिवशी मोडायची. कधी कधीतर गेल्या वर्षीच्या फटाकड्या पुढच्या वर्षी उडवल्याच्याही आठवणी आहेत.आज फटाकड्याचे संपुर्ण दुकान विकत घेऊ शकतो पण ते उडवण्याचा आनंद मात्र विकत घेता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जगण्याच्या अशा आठवणी ज्या त्या वेळेसच जगाव्यात; वेळ निघून गेली की मग अनेक वर्षांनी अशा आठवणी शब्दात उतरत नाहीत. तुमची मिळकत कितीही असुद्या पण तुमच्या लेकरांना आनंदाची मिळकत द्यायला कमी पडू नका.

दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा !

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २८ ऑक्टोंबर २०१९