रिंदगुड हा लघुकथासंग्रह लेखकाच्या नजरेला दिसलेल्या, ह्रदयाला भिडलेल्या आणि मनाला उमगलेल्या गोष्टींचा एक वास्तववादी समुह आहे. निसर्गाने सुचवलेल्या साम्राज्याला शब्दरूपी परिच्छेदांत थोडक्यात मांडुन त्यातुन आपल्याच जिवनातला अर्थ सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने केला आहे.या पुस्तकातली प्रत्येक कथा एक सत्य घटना असुन स्वतःच्या डोळ्यांनी पाहुन ह्रदयावर छापलेलं जस्सन तस्स शब्दांकरवी कागदावर उतरवलंय.रिंदगुड मधली एकही कथा वा प्रसंग लेखकाची प्रतिभा दाखवायची म्हणुन कल्पना करून रंगवलेली नसुन. यातल्या प्रत्येक कथेतला शब्दन शब्द मातीत पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या थेंबा एवढा शुद्ध आहे.जगण्याची रिंद चांगली असली कि आयुष्यातला गुडनेस वाढतो सरतेशेवटी एवढंच लिहावंसं वाटतं कि लहानपणी चिखलात खेळण्याची सवय प्रत्येकालाच असते परंतु जाणतेपणी आयुष्याचाच चिखल होतो. तो होण्याआधी हा शब्दांचा चिखल अवश्य वाचा. नक्कीच तुमच्या भविष्याचे बांधकाम चांगले होईल.

- प्रा.विशाल विजय गरड
( वक्ता | चित्रकार | कवी | लेखक )

मुलुखगिरी हे पुस्तक प्रा.विशाल गरड यांच्या आजवर झालेल्या व्याख्यानातील काही निवडक व्याख्यानांची रोजनिशी आहे. जेव्हा एखादा वक्ता हा लेखक असतो तेव्हा त्याला आलेले अनुभव तो टिपुन ठेवत असतो. प्रा.गरड यांच्या लेखणीमुळे त्यांच्या विचार पेरणीच्या मुलुखगिरीतले असंख्य अनुभव या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत. आजपर्यंत भाषण कलेसंदर्भात शेकडो पुस्तके प्रकाशित आहेत परंतु भाषणे व व्याख्याने दिल्यानंतर आलेल्या अनुभवांचं, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचं जिवंत वर्णन करणारं मुलुखगिरी हे एकमेव पुस्तक आहे. लेखन आणि प्रबोधन क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना हे पुस्तक एक प्रेरणेचा स्रोत आहे. हे पुस्तक वाचताना असे प्रसंग, एवढं प्रेम, एवढा सन्मान आपल्यालाही मिळावा ही भावना मनात येते आणि मग सुरू होतो शब्दपुजेचा परिपाठ; लेखकालाही नेमकं हेच अपेक्षित आहे. वाचणाची आवड जोपासुन, विचारांची कास धरून जिवनाची वाटचाल केल्यावर नेमकं आपल्या पदरात काय पडतं ? खऱ्या श्रीमंतीची व्याख्या काय ? मेल्यावरही जिवंत कसे राहता येते ? माणसांसोबत त्यांच्या कुटुंबांचे आणि गावाचे परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य प्रबोधनात आहे ते कशा पद्धतीने व्हायला हवे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात सापडतात.एका वक्त्याच्या पडद्यामागच्या गोष्टी, प्रत्यक्ष बोलताना आलेले अनुभव, श्रोत्यांचा प्रतिसाद हे सारं काही जाणून घेण्यासाठी सिएटल पब्लिकेशनने प्रकाशित केलेले 'मुलुखगिरी : व्याख्यानांची रोजनिशी' हे पुस्तक वाचायलाच हवे.

- प्रा.विशाल विजय गरड
( वक्ता | चित्रकार | कवी | लेखक )