नुकताच एस.एस.राजामौली यांचा RRR हा चित्रपट पाहिला. त्यांच्या या चित्रपटावर जसा रामायणाचा प्रभाव आहे तसाच मला त्यातील काही प्रसंगावर शिवचरित्राचा प्रभाव दिसला. मी जेव्हा त्यांचा बाहुबली पाहिला होता तेव्हाही त्या चित्रपटात शिवचरित्रातल्या प्रसंगांच्या साम्याबद्दल सविस्तर लिहिले होते. याही वेळी RRR पाहिल्यानंतर काही नोंदी तुमच्यासमोर मांडतोय. ज्यांनी चित्रपट पाहिलाय त्यांच्या लगेच लक्षात येईल ज्यांनी नाही पाहिला त्यांच्या पाहिल्यावर लक्षात येईल.

RRR मध्ये,
इंग्रज सरकार मधली राणी भीमला जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी विडा ठेवते तेव्हा राम हा पोलिस अधिकारी तो विडा उचलतो.
शिवचरित्रात,
आदिलशाहीच्या दरबारात जेव्हा बडी बेगम साहेबा छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी विडा ठेवते आणि तो विडा अफजल खान उचलतो.

RRR मध्ये,
पोलिस अधिकारी भीमला पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा भीम त्याच्यावर वाघ नख्याचा वार कारतो.
शिवचरित्रात,
अफजल खान वधाच्या वेळेस शिवराय वाघनख हे शस्त्र वापरून खानाचा कोथळा बाहेर काढतात

RRR मध्ये,
भीमला पकडल्यानंतर इंग्रज अधिकारी त्याच्यावर अत्याचार करतात. सर्व जनतेसमोर त्याला गुडघे टेकायला लावतात पण भीम प्रचंड अत्याचार सहन करूनही त्यांच्यासमोर गुडघे टेकवत नाही.
शंभू चरित्रात,
छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर औरंगजेब त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करतो तरीही शंभूराजे झुकत नाहीत.

RRR मध्ये,
भीमला फाशी देण्यासाठी इंग्रज अधिकारी यमुना नदीच्या तटाची निवड करतात. त्याचा शेवट करण्यासाठी त्याला नदीच्या तीरावर घेऊन जातात.
शंभू चरित्रात,
छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणी वडू बुद्रुक येथील नदीच्या संगमावर घेऊन जाण्यात येते

RRR मध्ये,
भीम माल्ली या लहान मुलीला घेऊन इंग्रजांच्या तावडीतून सुटतो तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी इंग्रज अधिकारी त्याचा पाठलाग करतात.
शिवचरित्रात,
शिवाजी महाराज बाल संभाजीला सोबत घेऊन आग्र्याच्या कैदेतून सुटतात तेव्हा त्यांना पकडण्यासाठी औरंगजेब त्यांच्या मागावर मोगल सैन्य पाठवतो.

RRR मध्ये,
जंगलात प्राणी पकडताना भीमचा सहकारी झाडावर चढून ध्वनीचा कानोसा घेतो, राजवाड्यात ट्रक घालताना तो दरवाजाच्या आवाजाचा कानोसा घेतो आणि रामला जेलमधून सोडवण्यासाठी आलेला भीम जमिनीवर आवाज करून ध्वनी कंपनांच्या साहाय्याने रामला शोधतो
शिवचरित्रात,
हेरप्रमुख बहिर्जी नाईक जमिनीतून ऐकू येणाऱ्या घोड्यांच्या टापांच्या ध्वनी कंपनांवरून शत्रू किती जवळ आला आहे याचा मागोवा घेत. तसेच जंगलातून स्वारी जात असताना ते उंच झाडावरून टेहळणी करीत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील प्रसंगांना कथानकात टाकून त्यांना साजेशी भव्यता प्रदान करणारा दिग्दर्शक म्हणजे राजामौली सर होय. आत्ताही मराठीतले काही दिग्दर्शक शिवचरित्रावर चित्रपट करीत आहेत पण लो बजेटमुळे शिवचरित्राला साजेशी भव्यता देताना त्यांना मर्यादा येतात. तरीही उपलब्ध साधनांत त्यांनी आजवर जे चित्रपट केलेत त्याचे कौतुकच आहे पण का कुणास ठाऊक RRR पाहिला की प्रकर्षाने वाटते “भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पराक्रमाला एस.एस. राजामौली सरांनीच मोठ्या पडद्यावर उतरवायला हवं” जर असं झालं तर त्या चित्रपटाला एकटा महाराष्ट्रच हजार करोडच्या क्लब मध्ये नेऊन ठेवील.

विशाल गरड
६ एप्रिल २०२२