पांगरी पंचक्रोशितलं हे सर्वात जुने गणेश मंडळ; यंदा चाळीसाव्या वर्षात पदार्पन करत असताना गेल्या आठवडाभरात त्यांनी गणेशोत्सवानिमित्त राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, शिवाय ईतर मंडळांनी अनुकरण करावे असे आहेत. मुर्ती प्रतिष्ठापना करून दहा दिवस फक्त स्पिकरवर गाणी लावायची आणि दहाव्या दिवशी मिरवणूक काढून विसर्जन करायचं एकंदरीत बहुतांशी गणेश मंडळांची अशीच रूपरेषा असते परंतु पांगरीच्या श्रीराम तरूण गणेश मंडळाने मात्र अशा पायंड्याला छेद देत यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून जनमानसात स्वतंत्र स्थान निर्माण केलं. यावर्षी मंडळाने राबवलेले काही खास उपक्रम 👇🏽

● रक्तदान शिबीर
रक्तदान शिबिराचे आयोजन करून मंडळाच्या सर्व सदस्यांनी रक्तदान केले. तसेच गावातील नवयुवकांना रक्तदान करण्यासाठी मार्गदर्शन केले.

● व्याख्यान
युवकांमध्ये रक्तदानाचे महत्व माहित करून देण्याच्या दृष्टीने रक्तदान शिबिराआधी त्याबद्दल लघुव्याख्यान आयोजित केले. यावेळी वक्ते, आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

● वृक्षारोपन
गावातील शासकीय कार्यालये, पोलिस स्टेशन, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत अशा ठिकाणी वृक्षारोपन करून त्या झाडांच्या संरक्षणासाठी ट्री गार्ड सुद्धा बसवण्यात आले.

शालेय साहित्य वाटप
गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील मुलामुलींना वह्या, पेन व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिक्षकांना व शाळेला वर्गणी न मागता हा उपक्रम राबल्याबद्दल मुख्याध्यापकांनी व गावातील प्रतिष्ठीतांनी कौतुक केले.

● किर्तन
गावातील ग्रामस्थांसाठी प्रबोधनपर किर्तनाचे आयोजन करून चांगला विचार रूजवण्याचे काम केले.

● अन्नदान
मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवानिमित्त स्वखर्चाने अन्नदान करून गोरगरिबांना जेवण दिले.

● मिरवणूक
गावातील लहान मुलाच्या कलागुणांना वाव मिळाला म्हणून मराठी गीतांवर लेझिम व टिपऱ्या बसवून तसेच पारंपारीक वाद्यावर जल्लोष साजरा करून मिरवणूक शांततेत पार पाडली.

● वर्गणीमुक्त गणेशोत्सव
गावातील लोकांना सरसकट वर्गणी न मागता मंडळाच्या सर्व अधिकृत सदस्यांनी मिळून जमवलेल्या पैशातुनच सर्व खर्च करण्यात आला. मंडळाचे बहुतांशी सदस्य हे शेतकरी कुटुंबातील आणि छोटामोठा व्यवसाय करून व रोजंदारी करून उदरनिर्वाह करणारे आहेत.

जर प्रत्येक मंडळाने असा विचार केला तर नक्कीच समाज घडायला मदत होईल. सणांचा खरा आनंद अशाच गोष्टीतुन मिळत असतो. फक्त नाचगाण्यांसाठी वर्गणी खर्च करण्यापेक्षा समाजातुन आलेला पैसा जर समाज हितासाठीच वापरला गेला तर पुढील वर्षी लोक स्वतःहून वर्गणी देतील. वरिल सर्व चांगले उपक्रम राबवल्याबद्धल श्रीराम तरूण गणेश मंडळ, श्रीराम पेठ, पांगरी यांचे मनापासुन कौतुक व अभिनंदन !

लेखक : प्रा.विशाल गरड.
(सदस्य : श्रीराम तरूण गणेश मंडळ, पांगरी)